मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात भाजप आमदार पराग शाह यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
घाटकोपर पूर्व भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन, पदपथांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आमदार पराग शाह यांनी शुक्रवारी पाहणी आणि आंदोलन केलं होतं. याच दरम्यान, महात्मा गांधी मार्गावर एक रिक्षा चालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आलं. यावर संतप्त होत आमदार पराग शाह यांनी त्या रिक्षा चालकाला कानशिलात लगावली आणि शिवीगाळ केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
वल्लभबाग लेन आणि खौगली परिसरात अनेक दुकानदारांनी पदपथांवर खुर्च्या, बाकडे ठेवून अतिक्रमण केल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याच पार्श्वभूमीवर आमदार शाह यांनी या भागाला भेट दिली होती.
कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का?
या घटनेनंतर मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, रिक्षा चालकाने वाहतूक नियम मोडले असतील तरी आमदाराला थेट मारहाण करण्याचा अधिकार आहे का? कायद्याचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक असताना लोकप्रतिनिधींनी स्वतः कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
काही नागरिकांनी आमदारांच्या भूमिकेचं समर्थन करत "कठोर कारवाई आवश्यक" असल्याचं मत व्यक्त केलं आहे, तर अनेकांनी या कृत्याचा तीव्र निषेध करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया किंवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हायरल व्हिडीओमुळे हा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.