मुंबई : राज्यातील उर्वरित 23 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून रविवारी (21 डिसेंबर) निकाल जाहीर होणार आहे. बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं असलं, तरी काही ठिकाणी राडा, बोगस मतदान, मतदारांना कोंडून ठेवणे आणि पैशांचे आमिष अशा गंभीर आरोपांमुळे निवडणुकीला गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होतं.
अंबरनाथमध्ये बोगस मतदानाचे आरोप
अंबरनाथमध्ये 208 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेवर केला आहे. मतदानासाठी महिलांना एका सभागृहात गोळा करून ठेवल्याचा आरोप भाजप नेते अभिजीत करंजुळे यांनी केला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
नांदेडमध्ये महिलांना कोंडून ठेवल्याचा आरोप
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे महिलांना मंदिर व मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रसादाच्या नावाखाली चार हजार रुपयांचे आमिष दाखवून महिलांना डांबून ठेवल्याचा दावा करण्यात आला. नंतर संबंधित महिलांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहणी करून गैरप्रकार आढळला नसल्याचं स्पष्ट केलं.
धर्माबादमध्येच तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप झाला असून त्यातून मारहाणीची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
कोल्हापुरात मतदान केंद्रावर तणाव
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील मतदान केंद्रावर वाद झाला. एका नेत्याला मतदान केंद्रात प्रवेश का दिला, या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
कोपरगावमध्ये उमेदवारांमध्ये बाचाबाची
कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला. काही काळ तणावाचं वातावरण होतं.
बारामतीत आधीच झालेलं मतदान
बारामती नगरपालिकेच्या मतदानादरम्यान एका मतदाराचं मतदान आधीच झाल्याचं उघड झालं. संबंधित मतदाराकडून टेंडर वोट भरून घेण्यात आला आणि नंतर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
फुलंब्रीत मतदानादिवशी जादूटोणा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे मतदान केंद्राबाहेर काळी बाहुली, लिंबू आदी साहित्य आढळून आल्याने जादूटोण्याचा प्रकार समोर आला.
सिन्नर व पनवेलमध्ये बोगस मतदार प्रकरण
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
तर पनवेल महानगरपालिकेत एका वडिलांच्या नावावर 268 मुलांची नोंद आढळून आल्याने बोगस मतदार न वगळल्याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून रविवारी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.