सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • थंडीचा कडाका वाढला; पुढील दोन दिवसात किमान तापमानात मोठी घट, हवामान खात्याचा इशारा
  • अजित पवारांचा पक्ष आंदेकर कुटुंबातील दोघांना उमेदवारी देण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे मोठे संकेत
  • ‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तसं!’ – काँग्रेसची नवी टॅगलाईन, सतेज पाटलांनी मनपासाठीचा प्लॅन मांडला
  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पक्षाचा राजीनामा देईन; प्रशांत जगतापांचा इशारा
  • अजित पवार चक्क महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता; पुण्यातील राजकीय घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष
 विश्लेषण

राज्यात थंडीचा कडाका वाढला! पुढील दोन दिवसांत किमान तापमानात मोठी घट, हवामान खात्याचा इशारा

डिजिटल पुणे    23-12-2025 13:09:52

पुणे  : राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून किमान तापमानात झालेल्या लक्षणीय घटमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढलेला जाणवत आहे.मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला असून नाशिक, धुळे, नंदुरबारसह मराठवाड्यातही थंडीची तीव्रता वाढली आहे. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजे 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 5.8 अंश, तर परभणीत 6.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

हवामान विभागाचा अंदाज काय?

भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

23 ते 25 डिसेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 7 ते 9 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात पुढील 24 तास तापमानात फारसा बदल होणार नसून, त्यानंतर तापमानात पुन्हा घट होईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

पुणेकरांना हुडहुडी, गारठा कायम

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने मध्य महाराष्ट्रासह पुण्यातही गारठा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात थंडीची लाट होती आणि अद्यापही थंडीचा प्रभाव कायम आहे.

आज पुणे जिल्ह्यात किमान तापमान 7 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. हवेली 7.5°, शिवाजीनगर, पाषाण, बारामती, दौंड 8 ते 8.5°, आंबेगाव-तळेगाव 10 ते 11°, हडपसर 11.2°, कोरेगाव पार्क 13°, चिंचवड 14.5°, तर मगरपट्टा येथे 15.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

विदर्भ आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर

विदर्भात नागपूर आणि गोंदिया येथे किमान तापमान 9 अंश, तर भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ येथे 10 अंश होते. अमरावती व वाशिममध्ये 11 अंश, तर अकोला आणि चंद्रपूर येथे 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीत 12 अंश, नांदेड 10.5, धाराशिव 11.1, उदगीर 12.4, तर बीडमध्ये 9.6 अंश सेल्सिअस तापमान होते.

 पुढील काही दिवस राज्यात थंडीचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.एकूणच, राज्यात पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती