पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक तसेच क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पुणे महानगरपालिकेसमोर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकृतपणे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. आजवर मिळालेल्या संधीसाठी त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचे आभार मानले.
यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, “27 वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले ते कोणत्याही पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी. आजही माझ्या वाटचालीचे एकमेव ध्येय हेच आहे. पुढील काळातही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच राहील.”
दरम्यान, राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी 29 महापालिकांसाठी निवडणुका होत असून, त्याआधीच पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रशांत जगताप यांनी 22 डिसेंबर रोजीच आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केल्याची चर्चा होती.
महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. हाच विरोध त्यांच्या राजीनाम्याचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात त्यांनी दोन दिवसांपूर्वी संकेत दिले होते. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज त्यांनी पुणे शहराध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.