मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 227 प्रभागांच्या मुंबई महापालिकेत भाजप 140 तर शिंदे गटाची शिवसेना 87 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीतील अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस ही मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सर्व 227 जागा लढवतील, असे संकेत आहेत. या फॉर्म्युल्यावर अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळाचे लक्ष त्याकडे लागले आहे.
पहिल्या बैठकीत 52 जागांचा प्रस्ताव
यापूर्वी झालेल्या पहिल्या बैठकीत भाजपकडून शिंदे गटासाठी केवळ 52 जागा सोडण्याची तयारी दाखवण्यात आली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनंतर भाजपने आपली भूमिका बदलत शिवसेनेला अधिक जागा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणूक 2026 : महत्वाची माहिती
आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे.
एकूण प्रभाग : 227
मतदान : 15 जानेवारी 2026
मतमोजणी व निकाल : 16 जानेवारी 2026
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला असून तेव्हापासून प्रशासक राजवट लागू आहे. याआधीची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्या वेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर होत्या.
मुंबई महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम 2026
नामनिर्देशन दाखल : 23 ते 30 डिसेंबर
छाननी : 31 डिसेंबर
नामनिर्देशन मागे घेणे : 2 जानेवारी 2026
अंतिम यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी 2026
मतदान : 15 जानेवारी 2026
निकाल : 16 जानेवारी 2026
मुंबई महापालिका 2017 : पक्षीय बलाबल
शिवसेना – 84
भाजपा – 82
काँग्रेस – 31
राष्ट्रवादी काँग्रेस – 9
मनसे – 7
समाजवादी पार्टी – 6
एमआयएम – 2
अपक्ष – 5