उरण : उरण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी आम्ही उरणच्या नागरिकांसाठी २४×७ उपलब्ध राहू, आम्हाला भेटण्यासाठी कोणती अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही तसेच लोकांसाठी आमचा जनता दरबारही राहील अशी माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, उरणच्या सुज्ञ नागरिकांनी मला आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जे भरघोस मताधिक्य दिले, त्याबद्दल मी जनतेचे मनःपूर्वक आभार मानते. आज या खुर्चीवर बसताना माझ्यावर उरणच्या जनतेच्या विश्वासाचे दडपण नक्कीच आहे. पण ही खुर्ची केवळ एसीमध्ये बसून राहण्यासाठी नसून ती जनतेच्या सेवेसाठी आहे. जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी मी दर १५ दिवसांनी एकदा 'जनता दरबार' घेणार आहे.
लोकांमध्ये उतरून त्यांची सेवा करणे हेच माझे ध्येय असेल. कोणत्याही नागरिकाला आपल्या कामासाठी किंवा भेटीसाठी माझी 'अपॉइंटमेंट' घेण्याची गरज पडणार नाही; आमची दारे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उघडी असतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आज मिळालेले हे यश म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या गरजांकडे केलेले दुर्लक्ष आणि विकासकामांचा अभाव यांचाच परिणाम आहे. गेल्या १५ दिवसांत लोकांनी जे प्रेम आणि सहकार्य दिले ते माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. मी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसह सर्वच लोकप्रतिनिधींना हेच सांगू इच्छिते की, नगरपरिषदेत पाऊल ठेवताना सर्व पक्षांचे झेंडे बाहेर ठेवा आणि आपण केवळ 'जनतेचे सेवक' आहोत, याचे भान ठेवून काम करा असे आवाहन त्यांनी केले.
प्रचारादरम्यान आमचे नेते आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब, बाळ्या मामा आणि स्वर्गीय प्रशांत पाटील साहेब यांच्याबद्दल विरोधकांनी अत्यंत हीन दर्जाचे शब्द वापरून त्यांचा अपमान केला. यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असा अपमान मी मुळीच सहन करणार नाही आणि यापुढे उरणच्या कोणत्याही सुपुत्राला बोलण्याचे धाडस कोणी करणार नाही, याची खात्री मी आज देते अशा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
या निवडणुकीत केवळ भूमिपुत्रांनीच नाही, तर सर्व समाजांनी आणि सर्वधर्मीयांनी मला साथ दिली आहे. मी 'सर्वधर्म समभाव' जपून सर्वांना समान सन्मान देण्याचे आणि कोणाबाबतही दुजाभाव न बाळगण्याचे आश्वासन देते तसेच आज आमची सत्ता राज्यात किंवा केंद्रात नसली, तरी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन उरणच्या विकासासाठी हक्काने निधी आणि मदत मागणार आहे. केंद्रातील प्रश्नांसाठी सुप्रिया ताई सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि बाळ्या मामा यांच्या माध्यमातून संसदेत आवाज उठवला जाईल असे त्यांनी सांगितले. विरोधकांनी कितीही वल्गना केल्या की आम्ही 'टाचणीभर' काम करू देणार नाही, तरी त्यांनी एक लक्षात ठेवावे की, आदरणीय शरद पवार साहेबांनी मला शब्द दिला आहे - "कोणाच्या बापालाही घाबरायची गरज नाही, तुम्ही जनतेसाठी काम करा, आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत." पवार साहेबांचा शब्द दिल्लीचे तख्तदेखील पाळते, त्यामुळे उरणकरांच्या हितासाठी मी शेवटपर्यंत निष्ठेने काम करत राहीन असे आश्वासन त्यांनी दिले.