सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन जिवलग मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली.प्रज्ञा धनाजी कोकाटे (इयत्ता अकरावी) आणि स्नेहल काशिनाथ वाघमोडे (इयत्ता बारावी) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. प्रज्ञा स्कुटी चालवत स्नेहलला घेऊन मोहोळहून कुरुलकडे जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात प्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या स्नेहलला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान स्नेहलनेही अखेरचा श्वास घेतला.प्रज्ञा ही मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती, तर स्नेहल ही राष्ट्रमाता इंदिरा कन्या महाविद्यालयात बारावीत शिकत होती. दोघींच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.