मुंबई : आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना, मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी कल्याण येथे झालेल्या एका कार्यक्रमात हिंदुत्वावर स्पष्ट भूमिका मांडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आयोजनात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी नागरिकांना निवडणुकीत मतदान करताना सामाजिक आणि हिंदू हिताचा विचार करण्याचे आवाहन केले.
शरद पोंक्षे म्हणाले, “लोकशाहीत हिंदूंना दोन प्रकारच्या लढाया लढायच्या आहेत. पहिली लढाई ही निवडणुकीच्या मैदानात बटन दाबून जिंकायची आहे. ‘जो हिंदू हिताची बात करेल, तोच देशावर राज्य करेल’ हे वाक्य मनात कोरून ठेवा.” तसेच, “हिंदूंना कमीत कमी नुकसान करणाऱ्यांनाच मत द्या,” असेही त्यांनी नमूद केले.
गांधी कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका
भाषणादरम्यान शरद पोंक्षे यांनी गांधी कुटुंबावर अप्रत्यक्ष शब्दांत टीका केली. “तीन माणसांचं घर ज्याला नीट चालवता येत नाही, त्यांनी 140 कोटी लोकसंख्येच्या देशाला कसं चालवायचं हे शिकवू नये,” असे विधान त्यांनी केले.
‘दोन लढाया गुप्तपणे लढाव्या लागतील’ पोंक्षे यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, “संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या चौकटीत राहून आपल्याला या दोन्ही लढाया गुप्तपणे लढायच्या आहेत.” यावेळी त्यांनी काही आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवरही भाष्य केले.या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता असून, त्यांच्या भाषणावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.