पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. कारण अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्या आहे आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे काल (शुक्रवारी, ता २६) रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही. अशातच आज सकाळच्या सुमारास पुण्यातील अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी शरद पवारांच्या पक्षाचे नेते अमोल कोल्हे दाखल झाले, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील युतीची चर्चा रात्री उधळली असतानाच, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मात्र वेगळं राजकीय समीकरण आकाराला येत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांच्यात पुण्यातील जिजाई निवासस्थानी सुमारे अर्धा तास गुप्त बैठक झाली.
कोल्हे आणि अजित पवारांच्यात कशावर चर्चा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीत बिघाडीची चिन्ह निर्माण झाली असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र मविआ वगळता फक्त दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं का? या अनुषंगाने अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या आज सकाळी सकाळी झालेल्या गुप्त बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती खात्रीपूर्वक सूत्रांनी दिली आहे. घडाळ्याचा चिन्हावर लढा, असा प्रस्ताव पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांनी दिला नसल्यानं चर्चा पुढच्या टप्प्यात येऊन पोहचली असल्याची माहिती आहे.
पुण्यात युतीत तिढा का?
पुणे महापालिकेसाठी अजित पवार गटाने शरद पवार गटाला केवळ ३० ते ३५ जागांची ऑफर देत ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावरच लढण्याची अट घातली. या अटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीची चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे.या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे काल (शुक्रवारी, ता. २६) रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा मविआमध्ये सहभागी होण्याच्या हालचालीत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
पिंपरी-चिंचवडसाठी वेगळी रणनीती?
पुण्यात युतीत बिघाडीची चिन्हे असली, तरी पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र महाविकास आघाडी वगळून फक्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात का, यावर आज सकाळी झालेल्या अजित पवार–अमोल कोल्हे यांच्या गुप्त बैठकीत चर्चा झाल्याची माहिती खात्रीपूर्वक सूत्रांनी दिली आहे.विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडसाठी अजित पवार गटाने ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातलेली नसल्याने, ही चर्चा पुढील टप्प्यात पोहोचल्याचे समजते.
काँग्रेसचा स्पष्ट नकार
पिंपरी-चिंचवडमध्ये जर फक्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, तर काँग्रेस या आघाडीत सहभागी होणार नाही, असा स्पष्ट संदेश काँग्रेसने काल रात्रीच शरद पवार गटाला दिला आहे. त्यानंतर आजच्या बैठकीत मविआ वगळून केवळ दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात का, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.तसेच ज्या दोन जागांवर तिढा निर्माण झाला होता, तो सोडवण्याची तयारी अजित पवार गटाने दर्शवली असल्याचेही समजते. किमान पिंपरी-चिंचवडमध्ये तरी दोन्ही पवार गटांनी एकत्र यावे, यासाठी तडजोडीचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
उद्या बारामतीत तिघे पवार एकत्र
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीबाबत वेगवान घडामोडी सुरू असतानाच, उद्या बारामतीत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमधील ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या इमारतीचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवर काही चर्चा होते का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.