मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरे गटाचे निष्ठावंत खासदार संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊत निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 111 मधून संदीप राऊत तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या विक्रोळीतूनच संदीप राऊत मनपाची निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र याच वॉर्डवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील आग्रही असून माजी नगरसेवक धनंजय पिसाळ इच्छुक आहेत. त्यामुळे विक्रोळीत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात चढाओढ पाहायला मिळत आहे.
मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यानंतर जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाकरे गटासोबत चर्चा सुरू आहे. नुकतीच जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडी म्हणून मुंबईची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान, संदीप राऊत यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता संजय राऊत यांनी, “संदीप राऊतबद्दल मला माहिती नाही, मला वाटत नाही,” असे म्हणत एका वाक्यात विषय टाळला. मात्र संदीप राऊत निवडणूक लढवणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मुंबई महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : 23 ते 30 डिसेंबर
अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
उमेदवारी माघारी : 2 जानेवारी
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी
मतदान : 15 जानेवारी
निकाल : 16 जानेवारी
राजकीय हालचालींमुळे विक्रोळीतील वॉर्ड 111 कडे सर्वांचे लक्ष लागले असून, संदीप राऊत मैदानात उतरतात का याकडे आता उत्सुकता वाढली आहे.