पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका, चर्चा आणि राजकीय हालचालींनंतर अखेर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुणे महानगरपालिकेतही अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येत असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुणे महापालिका निवडणुकीसाठी युतीवर अंतिम एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युलाही ठरल्याची चर्चा आहे. त्यानुसार, अजित पवार गट 125 जागा तर शरद पवार गट 40 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यातही युती
पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे केली होती. याच कार्यक्रमातून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यानंतर पुण्यातही तसाच निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत होते, आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
आज पत्रकार परिषद, अधिकृत घोषणा अपेक्षित
आज दुपारी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, यावेळी युतीची अधिकृत घोषणा, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला, नेतृत्वाची भूमिका आणि आगामी रणनीती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणांवर परिणाम?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्याच्या राजकारणात ही युती कितपत प्रभावी ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.