सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 व्यक्ती विशेष

निष्ठावंत कार्यकर्त्यांची कुचंबणा; अर्ज भरला, मात्र पक्षाचा एबी फॉर्म नाही — महिला उमेदवाराला अश्रू अनावर

डिजिटल पुणे    29-12-2025 16:30:20

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नाराजी आणि इच्छुक उमेदवारांची कुचंबणा उघडपणे समोर येत आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून इच्छुक असलेल्या कलाबाई शिरसाठ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी पक्षाकडून एबी फॉर्म (अधिकृत तिकीट) न मिळाल्याने त्यांना भावनांचा आवर घालता आला नाही.

महापालिका निवडणुकांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐनवेळी संधी न मिळाल्याने अस्वस्थता वाढताना दिसत आहे. काही कार्यकर्ते पर्याय खुले ठेवत दुसऱ्या पक्षांकडे चाचपणी करत असल्याचं चित्र आहे. मात्र, पक्षाशी निष्ठा राखून राहिलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्याने दुःख व्यक्त होत असून, जळगावमधील एका महिला उमेदवाराला अर्ज भरल्यानंतर रडू कोसळल्याचा प्रसंग पाहायला मिळाला.

कलाबाई शिरसाठ यांनी यावेळी शिवसेना (ठाकरे गट)चे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. आपण मागासवर्गीय असल्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या उमेदवारीला विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादीला एकही जागा देण्यास तयार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करत, आंदोलन व उपोषणाचा इशाराही कलाबाई शिरसाठ यांनी दिला आहे. महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जरी ठरलेलं असलं, तरी अनेक प्रभागांमध्ये बंडखोरीची शक्यता वाढल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे.

काँग्रेसकडून सहा उमेदवारी अर्ज

जळगाव महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र काँग्रेस पक्षाबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसताना, काँग्रेसकडून आज सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

तिकीट मिळताच गुडघ्यावर बसून नेतृत्वाचे आभार

दरम्यान, भाजपकडून उमेदवारी प्रक्रियेचे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना थेट गुडघ्यावर बसून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आशीर्वाद घेतले. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात घडलेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. चंद्रकांत पाटील यांनीही या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले.महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत संघर्ष, नाराजी आणि भावनिक प्रसंगांनी राजकीय वातावरण तापल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती