सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 राजकारण

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंची मध्यस्थी; नाराज नेते व उमेदवारांची मध्यरात्री मातोश्रीवर बैठक

डिजिटल पुणे    30-12-2025 11:09:21

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीची शक्यता निर्माण झाली असताना, शिवसेना ठाकरे गटाने खबरदारीची पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मध्यस्थी केल्याचे समोर आले आहे.

वरळी विधानसभेत AB फॉर्म वाटपादरम्यान निर्माण झालेल्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीला AB फॉर्म मिळालेले उमेदवार तसेच नाराज पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 193 मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेले सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. तसेच प्रभाग क्रमांक 196 मध्ये विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने महिला शाखाप्रमुख संगीता जगताप आणि युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील नाराज झाल्या होत्या.

प्रभाग क्रमांक 197 मनसेला दिल्यानेही शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट राजीनाम्याचा इशारा दिला होता. या सर्व नाराजीवर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः मध्यस्थी करत सर्वांशी चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय झाला आणि नाराजी कितपत कमी झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

भाजप आमदार विद्या ठाकूर यांना धक्का

भाजप आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा आणि विद्यमान नगरसेवक दीपक ठाकूर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपने ‘आमदार-खासदारांच्या घरात तिकीट नको’ असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

वॉर्ड क्रमांक 50 ओबीसी आरक्षित झाल्याने दीपक ठाकूर यांना वॉर्ड क्रमांक 55 मधून उमेदवारी अपेक्षित होती. मात्र, वॉर्ड 55 मधून विद्यमान नगरसेवक हर्ष भार्गव पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 50 मधून भाजप कार्यकर्ता विक्रम राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गोरेगाव भाजपात बंडखोरी उफाळली

गोरेगावमध्ये भाजपमध्ये बंडखोरीचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे. वॉर्ड क्रमांक 54 मधील उमेदवारीवरून असंतोष वाढला असून, गोरेगाव विधानसभा महामंत्री संदीप जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संदीप जाधव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

भाजपकडून विप्लव अवसरेंना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून, मुलुंड विधानसभा महामंत्री प्रकाश मोटे यांनीही सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.महापालिका निवडणुकीपूर्वीच प्रमुख पक्षांमध्ये नाराजी, बंडखोरी आणि अंतर्गत संघर्ष उफाळून येत असल्याचे चित्र सध्या मुंबईच्या राजकारणात दिसून येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती