मुंबई : मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी (29 डिसेंबर) रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या बेस्ट बसने बससाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 9 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण भांडुप परिसरात खळबळ उडाली आहे.
संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास भांडुप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपोजवळ ही दुर्घटना घडली. कार्यालयातून घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने नोकरदार प्रवासी बस स्टॉपवर रांगेत उभे होते. त्याचवेळी बेस्टची इलेक्ट्रिक बस (क्रमांक MH 01 CV 6515) अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या दिशेने धावली.बसचा वेग इतका प्रचंड होता की अनेक प्रवाशांना, विशेषतः महिलांना, जागेवरून हलण्याचीही संधी मिळाली नाही. बसने एकूण 13 प्रवाशांना चिरडले. पुढे जाऊन ही बस विजेच्या खांबाला धडकली, ज्यामुळे खांबही कोसळला.या अपघाताचे थरारक दृश्य घटनास्थळाजवळील कपड्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बस मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अपघातानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना राजावाडी आणि अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
बसचालक पोलिसांच्या ताब्यात
पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण 13 प्रवासी बाधित झाले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये 8 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. बेस्ट बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या त्याच्याविरोधात कोणताही ठोस संशय नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे राजपूत यांनी सांगितले.दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी बसची गती आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.