पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीकडून (आप) शहरात साधारण 93 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अंतिम आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी, सर्वात आधी उमेदवारांची यादी जाहीर करणारा आणि सर्वाधिक उमेदवार देणारा पक्ष आम आदमी पार्टी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात अनेक पक्षांमध्ये नेत्यांच्या पक्षांतरामुळे आणि उमेदवारी वाटपात कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना प्रस्थापित पक्षांतील इच्छुकांमध्ये दिसून येत आहे. यामुळे पारंपरिक राजकारणाबाबत असंतोष वाढल्याचे चित्र आहे.
आम आदमी पार्टीने या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मतदारांच्या मनातही प्रस्थापित पक्ष आणि दलबदलू नेत्यांविरोधात नाराजी असल्याने त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटेल, असा विश्वास ‘आप’कडून व्यक्त करण्यात येत आहे.
सामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या धोरणांमुळे पुणेकर मतदार आम आदमी पार्टीला संधी देतील, अशी आशा पक्षाने व्यक्त केली आहे.
— मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी