सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

पुण्यात भाजपही अजित पवारांच्या पावलावर पाऊल? कात्रजमधून कुख्यात गुंड रोहिदास चोरघेच्या पत्नीला उमेदवारी

डिजिटल पुणे    31-12-2025 16:13:41

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदेकर कुटुंबातील महिलांना उमेदवारी दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असतानाच, आता भाजपनेही कात्रज-आंबेगाव परिसरातून कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

भाजपने प्रभाग क्रमांक ३८ (कात्रज-आंबेगाव) मधून रोहिदास चोरघे याची पत्नी प्रतिभा चोरघे यांना उमेदवारी दिली आहे. रोहिदास चोरघेवर हत्या, अपहरण, खंडणी आणि गोळीबारासारखे गंभीर गुन्हे दाखल असून, पुणे शहर आणि वेल्हे तालुक्यात त्याची दहशत राहिलेली आहे.

रोहिदास चोरघे हा वेल्हे तालुक्यातील वांगणी गावचा रहिवासी आहे. ७ फेब्रुवारी २००८ रोजी मनसे नेते व इस्टेट एजंट संदीप बांदल यांच्या हत्येप्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो येरवडा कारागृहात होता. २०११ मध्ये ससून रुग्णालयात उपचारासाठी आणले असताना त्याने पोलिसांना चकवा देत पलायन केले होते.

फरारी असतानाच त्याने पुणे सत्र न्यायालयाच्या आवारात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर गोळीबार करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या घटनेत साक्षीदाराचा मित्र जखमी झाला होता. तसेच पुणे–बेंगलोर महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबार करून दहशत निर्माण केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

यानंतर पोलिसांनी त्याला वांगणी गावातून अटक केली. विशेष म्हणजे अटकेच्या वेळी तो त्या गावाचा सरपंच होता. राजीनामा दिल्यानंतरही पुढील ग्रामपंचायत निवडणुकीत तो आपल्या पॅनलसह बिनविरोध निवडून आला. त्यानंतर त्याने कात्रज-आंबेगाव परिसरात आपले बस्तान बसवले.

संदीप बांदल हत्या प्रकरणात पुराव्यांच्या अभावी रोहिदास चोरघेची निर्दोष सुटका झाली असली, तरी त्याच्यावरील गोळीबाराचे अन्य खटले अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. आता पत्नीच्या माध्यमातून त्याची थेट महानगरपालिकेच्या राजकारणात एन्ट्री होत असल्याने, भाजपच्या उमेदवार निवडीवर तीव्र टीका होत आहे.

अजित पवार गटानंतर आता भाजपनेही वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्याने, पुण्यातील राजकारण पुन्हा एकदा गुन्हेगारीकरणाच्या आरोपांनी तापले आहे.


 Give Feedback



 जाहिराती