मुंबई : 2009 मध्ये प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या सुपरहिट सिनेमच्या सीक्वलबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होत्या. ‘3 इडियट्स 2’वर काम सुरू असल्याच्या बातम्या आणि आमिर खान, आर. माधवन व शरमन जोशी पुन्हा एकत्र झळकणार असल्याच्या अफवांमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता या चर्चांवर कलाकारांकडूनच स्पष्ट भूमिका समोर आली आहे.
सीक्वलबाबत माधवन साशंक
प्रसिद्ध चित्रपट पत्रकार सुभाष के. झा यांना दिलेल्या मुलाखतीत आर. माधवनने ‘3 इडियट्स’च्या सीक्वलबाबत आपली शंका व्यक्त केली.तो म्हणाला, “‘3 इडियट्स’चा सीक्वल ऐकायला नक्कीच छान वाटतो, पण तो थोडा विचित्रही ठरू शकतो. आमिर खान, शरमन जोशी आणि मी आता पूर्वीसारखे तरुण नाही. सीक्वलमध्ये आमची कथा नेमकी कुठे जाणार, हा मोठा प्रश्न आहे. राजकुमार हिरानींसोबत पुन्हा काम करण्याची माझी इच्छा नक्कीच आहे, मात्र ‘3 इडियट्स’चा दुसरा भाग करणे मला थोडंसं अयोग्य वाटतं,” असे माधवनने स्पष्टपणे सांगितले.
आमिर खानची भूमिका काय?
दुसरीकडे, आमिर खानने सीक्वलबाबत तुलनेने सकारात्मक भूमिका मांडली आहे.तो म्हणाला, “‘3 इडियट्स’ करताना आम्हा सगळ्यांना खूप मजा आली होती. रँचो हे पात्र माझ्या करिअरमधील सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक आहे. आजही लोक रँचोबद्दल बोलतात. त्यामुळे सीक्वल करायला मला नक्कीच आवडेल. मात्र सध्या तरी यासंदर्भात कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही,” असे आमिरने स्पष्ट केले.
‘3 इडियट्स’ची आजही जादू कायम
‘3 इडियट्स’ हा जगभरात 400 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. देश-विदेशातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने नवे विक्रम प्रस्थापित केले. अनेक वर्षे हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला. टीव्हीवरील वारंवार प्रक्षेपण आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आजही या चित्रपटाची लोकप्रियता तितकीच कायम आहे.
या सिनेमात आमिर खान, आर. माधवन, शरमन जोशी यांच्यासह बोमन ईराणी, करीना कपूर, ओमी वैद्य आणि मोना सिंह यांनीही लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या.
अधिकृत घोषणा नाही
एकूणच, ‘3 इडियट्स 2’बाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र आमिर खान आणि आर. माधवन यांच्या वक्तव्यांमुळे सीक्वलच्या अफवांना काहीसा विराम मिळाल्याचे दिसत आहे. चाहत्यांना आता राजकुमार हिरानीकडून येणाऱ्या अधिकृत घोषणेचीच प्रतीक्षा आहे.