पुणे : काँग्रेस कार्यकर्त्या सौ.मुबीना अहमद खान यांनी पुणे मनपा निवडणुकीसाठी कार्यक्रमांचा धडाका लावून निवडणूक लढण्याची वातावरण निर्मिती केलेली असताना काँग्रेस ने शेवटच्या दिवसापर्यंत ताटकळत ठेवल्याने सौ.मुबीना अहमद खान यांनी कोंढवा -कौसरबाग प्रभाग क्रमांक १९-अ मधून ओबीसी महिला उमेदवार म्हणून मनसेची उमेदवारी मिळवली.
३० डिसेंबर रोजी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष ,माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सन्मानाने सौ.मुबीना अहमद खान यांच्या कर्तृत्वाची , पदव्युत्तर शिक्षणाची आणि सामाजिक कार्याची दखल घेत उमेदवारी दिली.त्याबद्दल खान यांनी साईनाथ बाबर यांचे आभार मानले आहेत.
विचारधारा आणि पक्षाकडे पाहून काम करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांना काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवण्याची काहीही गरज नव्हती.युवा आणि शिक्षित कार्यकर्त्यांना काँग्रेसने वेळेत संधी द्यायला हवी होती,असे सौ.मुबीना अहमद खान यांनी म्हटले आहे.मनसे मध्ये जातीवाद नाही ,मुस्लिम द्वेष नाही. त्यामुळे अल्पसंख्यक समुदायाला न्याय देण्याची भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत,असे त्यांनी सांगितले.
जात -पात न मानता माणुसकीसाठी सन्मानपूर्वक काम करण्याची संधी मनसे देत असल्याने त्यांनी पक्षाचे आणि साईनाथ बाबर यांचे आभार मानले.मनसे -शिवसेना युती झाल्याने ताकद वाढली असून माजी आमदार महादेव बाबर पुन्हा शिवसेनेत आल्याने पारडे जड झाले आहे. दोन्ही पक्ष सर्वधर्म समभाव मानणारे असल्याने मुस्लिम कार्यकर्त्यांना या पक्षात सुरक्षित वाटते. महिला सक्षमीकरण,पीएमटी मधून महिलांना मोफत प्रवास मागणी ,नागरी सुविधा ,शौचालय मागणी असे शेकडो मुद्दे घेऊन सौ.मुबीना खान यांनी धडाडीने सामाजिक काम केले आहे.