सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

कल्याण-डोंबिवलीत महायुतीची घोडदौड; 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांनंतर श्रीकांत शिंदेंचा मास्टरस्ट्रोक

डिजिटल पुणे    01-01-2026 16:37:05

ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये अर्ज छाननीनंतर माघारीच्या टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मतदानापूर्वीच आघाडी घेतली असून तब्बल 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे 5 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.122 सदस्यसंख्या असलेल्या केडीएमसीमध्ये सत्तास्थापनेसाठी 62 जागांची आवश्यकता आहे. बिनविरोध निवडून आलेल्या 9 जागांमुळे महायुती सत्तेच्या दिशेने एक पाऊल पुढे गेली असून आता बहुमतासाठी केवळ 53 जागांची गरज उरली आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीमुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र आहे. त्यानंतर शिवसेनेचेही 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपची विजयी घोडदौड

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, मंदा पाटील यांच्यानंतर प्रभाग क्रमांक 24-ब मधून ज्योती पवन पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या आता 5 झाली आहे.

शिवसेनेचाही डंका; 4 उमेदवार बिनविरोध

शिवसेना (शिंदे गट)नेही केडीएमसीमध्ये आपली ताकद दाखवली आहे. पॅनेल क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली रणजित जोशी हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 28-अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

राज्यात महायुतीच्या 13 जागा बिनविरोध

केडीएमसीतील 9 जागांव्यतिरिक्त राज्यातील इतर महापालिकांमध्येही महायुतीने बिनविरोध यश मिळवले आहे. भाजपने धुळे महापालिकेत 2 आणि पनवेल महापालिकेत 1 जागा बिनविरोध जिंकत राज्यात एकूण 8 जागा बिनविरोध केल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीत 4 आणि जळगावात 1 जागा बिनविरोध मिळवली आहे. तसेच अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.यामुळे राज्यभरात भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीच्या एकूण 13 जागा बिनविरोध झाल्या असून, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची ताकद अधिक ठळकपणे समोर आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती