मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या तब्बल 22 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून शिंदे गटाच्या शिवसेनेचे 7 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
महायुतीच्या या बिनविरोध निवडींवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. “राज्यात बिनविरोध निवडून आणण्याचा उद्योग सुरू आहे. धमक्या, दबाव आणि ब्लॅकमेल करून अर्ज मागे घ्यायला लावले जात आहेत. भाजपा आणि मिंधे गटामध्ये यासाठी चढाओढ सुरू आहे. पालकमंत्र्यांचा दबाव वापरला जातोय. यालाच लोकशाही म्हणायचं का?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.राऊत पुढे म्हणाले, “जळगावमध्ये उमेदवारांचे अपहरण झाल्याचे प्रकार समोर आले. आम्हालाही अनेक ठिकाणी धमक्या आल्या, पण आम्ही त्याला भीक घालत नाही.”
केडीएमसीत महायुतीची आघाडी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे 5 तर शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने एकूण 9 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने येथे विजयाचा शंखनाद केला आहे.
शिंदे गटाचे स्थान अधिक भक्कम
15 जानेवारीला होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधीच प्रभाग क्रमांक 24 मधील निकालांनी शिंदे गटाची ताकद वाढवली आहे. या प्रभागात शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भाजपाचाही एक उमेदवार विजयी झाला आहे.
भाजपचे 12 उमेदवार बिनविरोध
कल्याण-डोंबिवली – 5
धुळे – 3
पनवेल – 1
भिवंडी – 1
जळगाव – 1
पिंपरी-चिंचवड – 1
शिंदे गटाचे 7 उमेदवार बिनविरोध
कल्याण-डोंबिवली – 4
जळगाव – 3
अजित पवार गटाचे 2 उमेदवार बिनविरोध
अहिल्यानगर – 2
मालेगावमध्ये 1 बिनविरोध
वॉर्ड 6 क – इस्लाम पार्टी
एकूण 8 महापालिकांमध्ये 22 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.