सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा दिमाखदार शुभारंभ झाला. सातारा जिल्ह्याचे वैभव आणि साहित्याची परंपरा यांचा अनोखा संगम आज या ठिकाणी पाहायला मिळाला.महाराष्ट्र साहित्य परिषदे, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातार) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांची मांदियाळी आणि ध्वजारोहण
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ऐतिहासिक प्रसंगी ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी, संदीप शहा, रवींद्र बेडकीहाळ यांसह अनेक साहित्यिक, मान्यवर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध ‘कट्ट्यांचा’ उत्साह
संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. हजारो पुस्तकांनी सजलेली ही ग्रंथनगरी वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरत आहे. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले:
कवी कट्टयाचे उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते व रवींद्र बेडकीहाळ यांच्या उपस्थितीत तर गझल कट्टयाचे उद्घाटन समंलनाचे स्वागत अध्यक्ष श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. प्रकाशन कट्टयाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले.
सातारकर पाहुणचारासाठी सज्ज: शिवेंद्रसिंहराजे भोसले
स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारकरांच्या वतीने सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले, “साहित्यातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज आहेत. स्वागताची कोणतीही उणीव भासू नये, यासाठी प्रशासन आणि आम्ही सर्वजण मनोभावे प्रयत्न करत आहोत. हे संमेलन सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरेल.
साहित्य संमेलनासाठी सातारकरांमध्ये मोठा उत्साह : विश्वास पाटील
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, या साहित्य संमेलनासाठी सातारकरांमध्ये मोठा उत्साह आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य आणि रसीक मंडळी आलेली आहेत. त्यांचा उत्साह पाहून आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. साहित्यशारदेच्या या उत्सवात सातारा आणि आजुबाजूच्या जिल्ह्यांमधील, संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यीक, रसिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आत्तापर्यंतच्या साहित्य संमेलनांमध्ये 99 वे साहित्य संमेलन अधिक उठावदार ठरेल
संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. कुलकर्णी म्हणाले, आज अत्यंत उत्साहात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी संमेलनाचा शुभारंभ झाला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व साहित्य संमेलनांमध्ये हे साहित्य संमेलन अधिक उठावदार ठरेल. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी स्वागतामध्ये कुठेही कमी पडणार नाही असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे महामंडळानेही हे मान्य केले आहे. अत्यंत दर्जेदार आणि उच्च प्रतिची अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासनाने खूप सहकार्य केले आहे. या ठिकाणी देशातून व जगाच्या काना कोपऱ्यातून आलेल्या साहित्य रसिकांचे स्वागत करतो.
साताऱ्यात ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी
साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा संत वाङ्ममय आणि साहित्य यांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कर्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद बेबले इत्यादी मान्यवर उपस्थित होते .श्रीफळ वाढवून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले.
राजवाडा येथून ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. या ग्रंथ दिंडीला स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसले मिलिंद जोशी यांनी खांदा दिला. सातारा शहरातून या ग्रंथदिंडी राजपथ ते पोवई नाका तेथून पोलीस कवायत मैदान मार्गे श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरी कडे मार्गस्थ झाली . तत्पूर्वी स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील,अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांची चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली . या ग्रंथदिंडीमध्ये ५५ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते .पर्यावरण, साताऱ्यातील पर्यटन, संत साहित्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ,सं त ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांनी केलेला संतपरंपरेचा प्रसार अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र सादर केले.