नाशिक : मुलांनो खूप शिकून मोठे व्हा. त्यासाठी परिश्रम घ्या, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.पिंपरखेड, ता. दिंडोरी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी सकाळच्या नाश्त्याच्यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. देवव्रत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याबरोबर नाश्ता घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थी कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहे. कुटुंबात सदस्य किती, आईवडील काय करतात, अशी आपुलकीने चौकशी केली. त्यांनी आयुक्त श्रीमती बनसोड यांच्याकडून आश्रमशाळा तेथील शिक्षणाचे माध्यम याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांना विद्यार्थिनीने काढलेले लहानसे चित्र भेट दिले. राज्यपालांसमवेत नाश्ता करतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.