सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
  • भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
 राजकारण

अजित पवारांनी आरोप करताना स्वतःची काळजी घ्यावी; आम्ही बोललो तर अडचणी वाढतील – रवींद्र चव्हाणांचा इशारा

डिजिटल पुणे    03-01-2026 14:15:27

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने गेल्या सात वर्षांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“अजित पवार यांनी आरोप करताना सर्वप्रथम स्वतःच्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर आरोप करत आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आरोप-प्रत्यारोप कसे करावेत याचाही त्यांनी विचार करायला हवा. आम्ही जर बोलायला सुरुवात केली, तर त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढतील,” असा इशाराच रवींद्र चव्हाण यांनी दिला.

अजित पवार यांनी यापूर्वी “ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते सगळे आज माझ्यासोबत सरकारमध्ये बसले आहेत,” असे विधान करत भाजपवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, “यंदाची निवडणूक पुण्याच्या विकासासाठी आहे. पुणेकरांना दर्जेदार नागरी सुविधा कोण देऊ शकते, हा खरा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विकासाचा गतिमान नमुना सादर करत आहे.”ते म्हणाले, कोरोनामुळे महापालिका निवडणूक लांबणीवर पडली होती. आता निवडणूक होत असताना पुण्यात पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबवले जात आहेत. पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून जी स्वप्ने पाहिली गेली होती, ती प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.

“महाविकास आघाडीच्या काळात केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही पुण्यात मेट्रो सुरू होऊ शकली नाही. मात्र मोदी सरकार आल्यानंतर पुण्यात मेट्रो सुरू झाली असून आज ३३ किलोमीटरचे मेट्रो जाळे कार्यान्वित झाले आहे,” असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती