सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
  • भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
 जिल्हा

“तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, पण माणूस माणसापासून दूर गेला”

डिजिटल पुणे    03-01-2026 15:36:42

छत्रपती संभाजी नगर : खरंच,प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीला बघता-ऐकता येते; आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा-वेदना दिसत नाहीत,ही ओळ आजच्या समाजाचं नेमकं प्रतिबिंब आहे. तंत्रज्ञानाने माणसाला आकाशाएवढं मोठं केलं,पण माणूसपण मात्र हातभर लहान केलं आहे.आपण चंद्रावर पोहोचलो,पण शेजाऱ्याच्या डोळ्यातील अश्रू ओळखायला विसरलो.ही विसंगतीच आजची खरी शोकांतिका आहे.

आज मोबाईलच्या एका क्लिकवर जग हातात आलं आहे. व्हिडिओ कॉलवरून सात समुद्रापलीकडचा चेहरा दिसतो,आवाज ऐकू येतो,भावना व्यक्त होतात.पण याच घरात राहणाऱ्या आई-वडिलांचा थकलेला चेहरा,पत्नीचा दबलेला आवाज,मुलांच्या मनातील भीती मात्र आपल्याला जाणवत नाही.आपण “ऑनलाइन” आहोत,पण “संवेदनशील” राहिलो आहोत का,हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

प्रगती एवढी झाली आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता माणसासारखी विचार करू लागली; आणि अधोगती इतकी झाली आहे की माणूसच विचार करायला थांबला.सोशल मीडियावर मतं ओतली जातात,पण समोरच्या माणसाचं ऐकून घेण्याची तयारी उरलेली नाही. एका पोस्टवर हजारो लाईक्स मिळतात,पण गरजूंना दिलेल्या एका आधाराचा “रिपोस्ट” होत नाही.दान पेटीत टाकलेली मदत कमी झाली,आणि स्टेटसवर दाखवलेली सहानुभूती वाढली.

प्रगती एवढी झाली आहे की वाहनं प्रचंड वेगाने धावतात; आणि अधोगती इतकी झाली आहे की माणसाचं जीवन मूल्य कमी झालं आहे.रस्त्यावर अपघात झाला की लोक थांबून मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढतात.माणूस पडलेला दिसतो,पण कॅमेऱ्याच्या फ्रेममधून त्याची वेदना बाहेरच राहते.आपण पाहतो,पण स्पर्श करत नाही; ऐकतो,पण समजून घेत नाही, हीच तर संवेदनांची गळचेपी आहे.प्रगती एवढी झाली आहे की उपचार अत्याधुनिक झाले; आणि अधोगती इतकी झाली आहे की आजारपणात माणूस एकटा पडतो.रुग्णालयात यंत्रं आहेत,औषधं आहेत,पण हात धरून धीर देणारी माणसं कमी झाली आहेत.मानसिक आरोग्याची चर्चा होते, पण मानसिक आधार देण्याची तयारी दिसत नाही. “सगळं ठीक आहे” असं लिहिलेल्या मेसेजमागे लपलेली हतबलता आपण ओळखत नाही.

 प्रगती एवढी झाली आहे की शिक्षण सर्वदूर पोहोचलं; आणि अधोगती इतकी झाली आहे की विवेक हरवत चालला आहे.पदव्या वाढल्या,पण संवेदना कमी झाल्या. स्पर्धेत जिंकण्यासाठी सर्वकाही योग्य वाटू लागलं. यशाचं मोजमाप पगाराने होतं,पण माणूस म्हणून आपण किती उंचावलो याचं मोजमाप कुणी करत नाही.मात्र आशेचा किरण अजूनही आहे. कारण माणूस बदलू शकतो.थोडं थांबून पाहिलं, ऐकलं, हात पुढे केला तर ही अधोगती थांबू शकते. शेजाऱ्याला “कसं आहे?” असा खरा प्रश्न विचारला,घरातल्या माणसाला वेळ दिला,रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला मदत केली,निराश मनाला शब्दांचा आधार दिला,तर तंत्रज्ञानाची प्रगती माणुसकीच्या प्रगतीसोबत चालू लागेल.आपण मोठे बदल करू शकत नाही,असं नाही; पण छोटे बदल नक्की करू शकतो. फोन बाजूला ठेवून समोर बसलेल्या माणसाकडे पाहणं, ऐकणं,हेच आजचं खरं मोटिवेशन आहे.कारण जग बदलण्यासाठी आधी आपण बदलायला हवं.प्रगती थांबू नये,पण माणुसकी हरवू नये.तंत्रज्ञान हातात असू दे, पण हृदयात माणूस जिवंत राहू दे.


 Give Feedback



 जाहिराती