पुणे : आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रशांत कांबळे वार्ड क्रमांक ३८ – बालाजी नगर, आंबेगाव, कात्रज यांनी आज आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी जाहीरनामा अधिकृतरित्या प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांचे मूलभूत प्रश्न, आर्थिक दिलासा, पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वच्छ प्रशासन यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या जाहीरनाम्यात महानगरपालिकेचे अनावश्यक कर कमी करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या मालमत्तेशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी खरेदी-खत प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व नियमितपणे चालू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभागातील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची वणवण कायमची थांबवण्याचा संकल्प जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे. नियमित, पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा करून टँकरमुक्त प्रभाग निर्माण करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी डी.पी. रोडचे रुंदीकरण डीपी रोड मोठा करणे, करण्यात येणार असून, सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. यासोबतच खड्डेमुक्त रस्ते ही प्रमुख हमी देण्यात आली आहे.
पालिकेत नव्याने रोजगारनिर्मिती करून चार तास काम आणि दहा हजार रुपये पगार देण्याची योजना राबवण्यात येणार आहे.महिलांसाठी सर्वत्र मोफत बस सेवा, नागरिकांसाठी खुली व सुरक्षित गार्डन्स, तसेच दर्जेदार सरकारी शाळा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.याशिवाय पत्रकारांसाठी पालिका व म्हाडामार्फत स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देणे, जांभूळवाडी तलाव स्वच्छ करणे, तसेच सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे हेही जाहीरनाम्यात नमूद आहे.
या जाहीरनाम्याचा सर्वात महत्त्वाचा आणि वेगळा मुद्दा म्हणजेनगरसेवक झाल्यानंतर “नगरसेवक” हा शब्द न वापरता स्वतःला “सेवक” म्हणवून घेण्याचा निर्णय. तसेच नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या कोणत्याही विकासकामांवर स्वतःचे किंवा कुटुंबातील कोणाचेही नाव कुठेही लावले जाणार नाही, अशी ठाम भूमिका प्रशांत कांबळे यांनी मांडली आहे.जाहीरनाम्यात दिलेल्या कामांचा पाठपुरावा न झाल्यास नगरसेवक पदाचा स्वेच्छेने राजीनामा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्रावर लेखी स्वरूपात दिले आहे.
या प्रभागामध्ये यापूर्वी माजी नगरसेवक कार्यरत राहिलेले असून, यावेळी मोठी चुरस निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीकडून मांडण्यात आलेला हा आव्हानात्मक, पारदर्शक आणि जनहिताचा जाहीरनामा नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांवर आधारित प्रशासन उभारण्याची भूमिका या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे मांडण्यात आली आहे.आता या प्रभागातील नागरिक कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
