नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 05) सकाळी साडेसातच्या सुमारास विठ्ठल तुकाराम गायकवाड (वय 58) यांचा मृतदेह मळ्यातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृताच्या डोक्यावर, तोंडावर आणि ओठांवर गंभीर जखमा आढळून आल्या. बिछान्यावरही मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मुलावर संशय, कबुली उघड
पंचनामा करत असताना मृताचा मुलगा श्रीकृष्ण गायकवाड घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, जमलेल्या नागरिकांसमक्ष श्रीकृष्णने गुन्ह्याची कबुली दिली.
वडिलांकडून त्रास; भीतीतून टोकाचा निर्णय
श्रीकृष्णने सांगितले की, वडील विठ्ठल गायकवाड यांना दारूचे व्यसन होते. नशेत ते वारंवार शिवीगाळ व मारहाण करत असत. तसेच शनिवारी (दि. 03) रोजी शेतात करंटच्या तारा लावून आपला जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याने केला. वडील आपल्याला ठार मारतील, अशी भीती मनात निर्माण झाल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे कबुलीमध्ये नमूद केले.
झोपेत असताना हल्ला
रविवारी (दि. 04) रात्री साडेदहाच्या सुमारास विठ्ठल गायकवाड जेवण करून मळ्यातील खोलीत झोपायला गेले. रात्री साडेअकराच्या सुमारास श्रीकृष्ण कोणालाही न कळवता मळ्यात गेला. वडील झोपेत असल्याची खात्री करून, खोलीतील लोखंडी पाईपने डोक्यावर, तोंडावर व ओठांवर जोरदार वार करून त्यांचा जागीच खून केल्याची कबुली त्याने दिली.
गुन्हा दाखल; तपास सुरू
या प्रकरणी मृताचे चुलत भाऊ जगन्नाथ नामदेव गायकवाड यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी श्रीकृष्ण गायकवाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत.