पुणे : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी १७ वर्षीय तरुणाला मुलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेसेज करून भेटीस बोलावले आणि त्याचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या केली. दगडाने ठेचून व कोयत्याने वार करून खेड शिवापूर परिसरात तरुणाचा खून करण्यात आला.
मृत तरुणाचे नाव अमनसिंग सुरेंद्रसिंह गच्चड (वय १७, रा. टिगरेनगर, विश्रांतवाडी) असे आहे. अमनसिंग २९ डिसेंबर रोजी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला होता, मात्र तो परत न आल्याने त्याच्या आईने ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल सीडीआर आणि लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला. तपासात अमनसिंगला प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर) आणि नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे) यांच्यासह दोन विधिसंघर्षित बालकांनी जुन्या वादातून फसवणुकीने कात्रज येथे बोलावून अपहरण केल्याचे उघड झाले.
यानंतर त्याला खेड शिवापूर परिसरात नेऊन दगड व कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली. आरोपी कर्नाटकातील बेळगाव येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पुणे पोलिस करत आहेत.