अकोला: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर काल (6 जानेवारी) अकोल्यामध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता. राजकीय आणि कौटूंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. त्यांनतर मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिलं आहे. अशातच अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हिदायत पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी काही राजकीय वर्तुळातील नेत्यांची नावे समोर आली आहेत, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचं नाव आलं आहे.अकोला ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचे गुन्हे दाखल होतात का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष
हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन् जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश आहे. अकोट ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचे गुन्हे दाखल होतात का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नाव समोर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल हल्ला प्रकरणात पाच आरोपींवर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री पाच आरोपींवर खुनाचा प्रयत्न करीत कट रचल्याचा आरोप असल्याने गुन्हे दाखल करण्यात आला होता. पटेल कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत. आता हिदायत पटेलांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात खुनाची कलमं वाढणार का?, याकडे लक्ष लागलं आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचा आरोप केलेल्या नावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते संजय बोडखे, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची आरोपींमध्ये नावे आहेत.
मशिदीत नमाज पाडून बाहेर पडताच प्राणघातक हल्ला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर काल (6 जानेवारी) अकोल्यात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता. राजकीय आणि कौटूंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. त्यांनतर मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिलं आहे. मात्र आज अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हिदायत पटेल यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
हिदायत पटेल हे काल (मंगळवारी) दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर मोहाळा गावातील मशिदीत नमाज पाडून बाहेर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र हल्ल्यात जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र अखेर उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 आरोपी होते. हत्या करणारा आरोपी उबेद हा हत्या झालेल्या मतिन यांचा पुतण्या आहे. हिदायत पटेल 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. मात्र त्यांच्या या मृत्यूच्या बातमीने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
कुटुंबीयांच्या तक्रारीतून खळबळ
पटेल कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत थेट राजकीय नेत्यांची नावे घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व आरोपींची चौकशी केली जात आहे.
जुन्या वादाची पार्श्वभूमी
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मोहाळा गावात भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांच्या हत्येचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 जण आरोपी होते. सदर हल्लेखोर उबेद पटेल हा मतीन पटेल यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा हल्ला जुन्या वादातून घडल्याचा संशय अधिक बळावला आहे.
कोण होते हिदायत पटेल?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष
अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रमुख मुस्लिम चेहरा
2014 व 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार
जिल्हा बँकेचे 25 वर्षांहून अधिक काळ संचालक
अकोट तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष
अकोट बाजार समितीचे माजी सभापती व सध्याचे संचालक
राजकीय वर्तुळात शोक आणि संताप
हिदायत पटेल यांच्या मृत्यूमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच कट आणि सहभागाबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.