मुंबई : राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नुकत्याच अमरावती, मेळघाट, अकोला, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या होत्या, या भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबतची आढावा बैठक मंत्रालयातील समिती सभागृहात झाली.
बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, डॉ. सरिता हजारे उपस्थित होते. संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच आदिवासीबहुल भागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
आदिवासी बहुल सर्व जिल्ह्यात आरोग्य तपासणीचे विशेष कॅम्प आयोजित करावेत. अमरावती जिल्ह्यातील ‘धारणी’ येथील आरोग्य संस्थेचे श्रेणीवर्धन करावे. रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तातडीने करावी. सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वछता ठेवावी व उत्तम आहार व्यवस्था चांगली करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.मेळघाटातील ॲनेमिया निर्मूलन मोहीम, सिकलसेल तपासणी मोहीम अधिक प्रभाविपणे राबवावी. तसेच ग्रामविकास विभागाशी संबंधित पदे भरण्याबाबत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.