: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय हालचालींना वेग आला असून, सुतारवाडी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेने आज राजकीय वातावरण तापवून टाकले. भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, विकासाच्या मुद्द्यावर सुतारवाडीकरांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले.
स्वराज्य चौक येथून सुरू झालेली ही पदयात्रा सुतारवाडीच्या गल्लीबोळांतून मार्गक्रमण करत असताना परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले, तर नागरिकांनी घरांच्या गॅलरीतून फुलांची उधळण करत आपला पाठिंबा व्यक्त केला. तरुणांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हा उत्साह केवळ निवडणूक प्रचारापुरता मर्यादित न राहता, भाजपच्या कामगिरीवर जनतेने दिलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत होती.

या पदयात्रेदरम्यान अधिकृत उमेदवार लहू बालवडकर सुतारवाडीच्या विकासाबाबत स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडली. "निवडणूक जिंकणे हा अंतिम उद्देश नसून, सुतारवाडीला सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक उपनगर म्हणून विकसित करणे हेच खरे ध्येय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक नियोजन या मुद्द्यांवर आगामी काळात ठोस कामे केली जातील", असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
पदयात्रेत भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे आणि श्री. लहु गजानन बालवडकर यांच्यासह पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आणि तरुणांचा उत्साह पाहता, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजपची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
“सुतारवाडीकरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी जबाबदारी आहे. आम्ही केवळ आश्वासने देत नाही, तर कामाच्या माध्यमातून उत्तर देतो,” असे उमेदवारांनी यावेळी सांगितले. या भव्य शक्तीप्रदर्शनामुळे सुतारवाडीत भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ०९ हा भाजपसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.