पुणे : गोखलेनगर, वाकडेवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वसाहती असून त्यामध्ये ड्रेनेज लाईन,पाणी लाईन, रस्ते अशा अनेक सुविधा अपुऱ्या आहेत. या भागात एकीकडे टोलिजंग बिल्डिंग्स आणि दुसरीकडे झोपडपट्टी अशी स्थिती आहे. येथील डॉ भाभा हॉस्पिटल अजून सुरू झाले नाही, शिवाजीनगर बस स्थानक, विद्यापीठ उड्डाणपूल ही कामे रखडलेली आहेत. सरकारी शाळा चांगल्या नाहीत,वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. या समस्यांवर उत्तर काढू असे आप च्या उमेदवार शितल जौंजाळ यांनी प्रचारादरम्यान सांगितले.
प्रभात क्रमांक सात गोखले नगर वाकडेवाडी या शिवाजीनगर भागातील मतदार क्षेत्रात आम आदमी पार्टी तर्फे शंकर थोरात शैलेंद्र मेमाणे आणि शितल जौंजाळ हे उमेदवार उभे आहेत. या भागात वस्त्यांमधील दिवाबत्ती, ड्रेनेज लाईन, मुलांना कोचिंग याबाबत या उमेदवारांनी पाटील इस्टेट,नतावाडी, मुळारोड,इंदिरा वसाहत, खैरेवाडी, जनवाडी या भागात चांगले काम केलेले आहे. मूळचा काँग्रेसचा समजला जाणाऱ्या या प्रभागातील पूर्वीच्या उमेदवारांनी पक्षांतर केलेले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या भागात मतदारांच्या घरोघरी भेटी ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. भोसलेनगर भागात भाजप माजी नगरसेवकांचे फारसे काम नाही आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षांतर केले असल्याने परंपरागत काँग्रेसचे व सुशिक्षित मतदार यावेळेस आम आदमी पार्टीचा झाडू चालवतील असा विश्वास आपचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला.