सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी अधिक गतीने पुढे नेत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात नेहमी प्रथम क्रमांकावर आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण तसेच वैयक्तिक लाभ वितरण व सन्मान सोहळा पालकमंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे वैयक्तिक लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असून, त्याचबरोबर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत असून, विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या प्रत्येक निर्देशांकात पुढे राहील आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवेल, असा दृढ विश्वास व्यक्त करत पालकमंत्री राणे यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य होत आहे. विविध क्षेत्रांत जिल्हा परिषदेने शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवून शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य व पारदर्शक वापर करणे, वेळेत कामे पूर्ण करणे आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे यावर भर देण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक मानसिकतेने, लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठेवून काम केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास निश्चित साध्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री राणे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रणालीचा वापर करणारा पहिला जिल्हा ठरत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. जिल्हा परिषदेमार्फत एआयचा प्रभावी वापर करण्यात येत असल्यामुळे कामकाजात गती, अचूकता आणि पारदर्शकता वाढली असून, प्रत्यक्ष प्रगती स्पष्टपणे दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक बनविण्याचा जिल्ह्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले. आज विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या यशकथा समाजापर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशा यशकथांमुळे इतर नागरिकांनाही योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत असून, उत्पन्नात वाढ झाल्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात निश्चितच वाढ होईल, असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात येत आहे. हा निधी शासनाचा नसून जनतेच्या हक्काचा आहे. त्यामुळे प्रत्येक रुपया जनतेच्या हितासाठी, पारदर्शक आणि प्रभावीपणे खर्च होणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना आणि निधीचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचावा, हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपण जनतेसाठी सदैव कार्यरत असल्याचे सांगत, पालकमंत्री या नात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचा पुनरुच्चार केला. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात विकासाचा आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी प्रास्ताविक केले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परब यांनी आभार मानले.यावेळी विविध येाजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. यावेळी लाड पागे समितीच्या शिफारशी नुसार 13 पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल चावी वाटप, आयुष्मान कार्ड धारकांना कार्डाचे वाटप, वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन निधी वितरण, सेस अनुदानातून मागासवर्गींयांना शिलाई मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य, घरकुलासाठी अर्थसहाय्य असे विविध प्रकारचे सहाय्य देण्यात आले.