पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील औंध (बाणेर रोड) येथील निवासस्थानी मोठ्या चोरीची घटना घडली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. घरातील नोकराने गुंगीचे औषध देऊन पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांसह पाच जणांना बेशुद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी चतुःश्रृंगी पोलीस करत आहेत.
गुंगीचे औषध देऊन चोरी
खेडकर कुटुंब बाणेर रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहे. या घरात काही नोकर देखील राहतात. त्यापैकी एक नोकर आठ दिवसांपूर्वी नेपाळहून कामावर आला होता. याच नोकराने रविवारी रात्री दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे. यावेळी पूजा खेडकर यांनाही बांधून ठेवण्यात आले होते.
दाराची कडी वापरून सुटका, पोलिसांना फोन
बांधून ठेवलेल्या अवस्थेत पूजा खेडकर यांनी दाराच्या कडीचा वापर करून स्वतःची सुटका केली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मोबाईलवरून चतुःश्रृंगी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असता, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्यासह वॉचमन व इतर नोकर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर
सर्व बेशुद्ध व्यक्तींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही गंभीर धोका नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोबाईलसह इतर वस्तू चोरीला
चोराने घरातील सर्वांचे मोबाईल फोन घेऊन पलायन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मोबाईल व्यतिरिक्त आणखी कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पूजा खेडकर यांनी अद्याप लेखी तक्रार दाखल केलेली नसून, मनःस्थिती ठीक झाल्यानंतर तक्रार देणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
पूजा खेडकर प्रकरण आधीच वादग्रस्त
पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी परीक्षेत ओबीसी व अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून अतिरिक्त संधी मिळवल्याचा तसेच कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या प्रकरणात “मोठा कट” असल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द करत भविष्यातील सर्व परीक्षांसाठी त्यांच्यावर बंदी घातली आहे. मात्र पूजा खेडकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.