मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेत नाराज आणि दुखावलेल्या मनसैनिकांबाबत पहिल्यांदाच जाहीर दिलगिरी व्यक्त केली. मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची भावना आपण समजू शकतो, असं स्पष्ट करत त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांबाबतही महत्त्वाचं भाष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले, “मी 20 वर्षांत पहिल्यांदाच युती केली आहे. या प्रक्रियेत सर्वांना तिकीट देता आलं नाही. त्यामुळे काही जण नाराज झाले, काहींनी रागात ‘जय महाराष्ट्र’ करत दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. जे दुखावले गेले असतील, त्या सर्वांची मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.”
‘जे गेले आहेत, ते परत येतील’
पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले,“जे गेले आहेत, ते आपलेच आहेत. ते परत येतील. कारण आता जे आहेत, ते कुठे जातील याची खात्री नाही. या सगळ्या परिस्थितीत मी त्यांना समजू शकतो,” असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
शिवाजी पार्कच्या आठवणींना उजाळा
सभेदरम्यान राज ठाकरे भावूक झाले. त्यांनी शिवाजी पार्कशी जोडलेल्या आठवणी सांगताना म्हटलं,“मी लहान असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेकदा या व्यासपीठावर आलो आहे. शिवसेनेची स्थापना याच शिवतीर्थावर झाली. आज मी आणि उद्धव एकत्र आलो आहोत. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील श्रीकांत ठाकरे आणि आमची माँ आज इथे असती तर हा क्षण अधिक भावनिक झाला असता. मात्र, मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठीचा हा लढा ते वरून नक्की पाहत असतील.”
मुंबईवरील संकटामुळेच युती
उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्यामागील कारण स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले,“मी आणि उद्धव एकत्र येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मुंबईवर आलेलं संकट. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईविरोधात डाव रचला जातोय. हिंदी सक्तीचा विषय आला तेव्हा आम्ही दोघंही कडाडलो. कारण कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.”