पुणे : भारती अभिमत विद्यापीठच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आयोजित रक्तदान शिबिरात ५८६ जणांनी रक्तदान केले.भारती विद्यापीठ संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त तसेच विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे राष्ट्रीय सेवा योजना यूनीट च्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून 'रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट' चे अध्यक्ष राम बांगड, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती परिवारचे अध्यक्ष बाबा शिंदे, प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद,उपप्राचार्य डॉ. सुनीता जाधव, रक्तदान शिबिर समन्वयक प्रा. प्रशांत यादव तसेच भारती ब्लड बँक सेंटर, महा सेंटर कॅम्प, जनसेवा ब्लड बँक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.दि. १२ जानेवारी २०२६ रोजी भारती विद्यापीठ(कात्रज) येथे हा कार्यक्रम पार पडला.
डॉ. सावजी यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या दूरदृष्टी व अथक परिश्रमांमुळे भारती विद्यापीठ अग्रगण्य शैक्षणिक संस्था कशी बनली याचा उल्लेख केला. सलग ३३ वेळा रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी रक्तदाते व आयोजकांचे कौतुक केले. वैद्यकीय आकडेवारी व फायदे सांगत त्यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट केले. रक्तदाते हे खरे नायक असून जीवन वाचवण्यासाठी सर्वांनी योगदान देत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. शिवाजीराव कदम यांनी रक्तदान शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल अभिनंदन केले. तसेच राम बांगड यांच्या उदात्त उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.डॉ. सुनीता जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत यादव यांनी आभारप्रदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया हिरवे यांनी केले. या शिबिरासाठी ९३७ स्वयंसेवकांनी स्वेच्छेने नोंदणी केली , ५८६ हून अधिक रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या.प्रबोधन सप्ताहातील उपक्रमांची माहिती देण्यात आली.