उरण : शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवावी, या उद्देशाने उरण तालुक्यातील आवरे या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी 'बायोचार' (Biochar) निर्मिती आणि वापराबाबत विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना टाकाऊ कचऱ्यापासून उपयुक्त खत कसे तयार करावे याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्येश्रीमती आर. टी. नारनवर (तालुका कृषी अधिकारी),एस. डी. गटकळ (मंडळ कृषी अधिकारी),धेंडे बी. वाय. (उप कृषी अधिकारी) व सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये आवरे सजेचे सहाय्यक कृषी अधिकारी राठोड ए. आर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी बायोचार म्हणजे काय, याची सविस्तर माहिती दिली. "पीक कापणीनंतर उरलेला कचरा न जाळता, त्यापासून शास्त्रीय पद्धतीने बायोचार तयार केल्यास जमिनीला कर्ब (Carbon) मिळतो आणि पाण्याची धारण क्षमता वाढते," असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बायोचारचे फायदे या विषयी माहिती देण्यात आली.जमिनीचा पोत सुधारतो, सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.अशी माहिती देण्यात आली. शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष यांचा वापर करून कमी ऑक्सिजनमध्ये ते जाळून कोळसा (बायोचार) तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आले.हे खत पिकांना कशा प्रकारे द्यावे, याचे तांत्रिक नियोजन समजावून सांगितले.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणाला आवरे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.