सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यास २ लाख ५० हजार रुपये दंड

डिजिटल पुणे    13-01-2026 11:12:44

नागपूर  : नायलॉन मांजामुळे जीवघेणे अपघात व यात निष्पाप लोकांसह पक्षांचे पडणारे बळी लक्षात घेता  मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यास 2 लाख 50 हजार रुपये दंड आणि नायलॉन मांजा वापरणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी दिले. अल्पवयीन मुले आढळल्यास त्यांच्या बाबतीत हा दंड त्यांच्या पालकांकडून वसूल केला जाईल. याचबरोबर हा दंड प्रत्येक वेळी झालेल्या उल्लंघनासाठी आकारण्यात येईल, असे न्यायालयीन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दंड स्वरुपात वसूल करण्यात आलेली रक्कम ही एका सार्वजनिक कल्याण निधी या नावाने बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये प्रशासनातर्फे जमा करण्यात यावी. सदर खाते जिल्हाधिकारी, नागपूर, महानगरपालिका आयुक्त, तसेच मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील निबंधक (प्रशासन) यांचा समावेश असलेल्या समितीद्वारे उघडण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून वसूल करण्यात आलेली दंडाची संपूर्ण रक्कम वरील खात्यात जमा करण्यात येईल. ही रक्कम नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या कोणत्याही पीडिताच्या उपचारासाठी वापरली जाईल. अशा पीडितास दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे प्रमाण संबंधित समितीद्वारे निश्चित करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दोषी आढळलेले व्यक्ती अथवा पालक जर तात्काळ दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असतील, तर संबंधित अधिकारी त्यांना 15 दिवसांच्या आत वरील दंडाची रक्कम नमूद खात्यात भरण्याची नोटीस काढतील. ही रक्कम जमा न केल्यास त्या-त्या जिल्ह्यातील संबंधित महसूल अधिकारी कायद्यानुसार प्रक्रिया राबवून सदर दंडाची रक्कम महसूल प्रक्रियेप्रमाणे थकबाकी वसूल करतील, असे आदेशात म्हटले आहे.

याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील सायबर सेलने नायलॉन मांजाच्या वापराबाबत तक्रारी किंवा माहिती प्राप्त करण्यासाठी एक व्हॉट्सॲप गट (WhatsApp Group) तयार करुन यात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्याची कार्यपद्धती पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक / उप पोलीस आयुक्त यांनी निश्चित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नायलॉन मांजामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास, ज्या क्षेत्राच्या हद्दीत ती घटना घडली आहे त्या क्षेत्रातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यास, न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन न केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांनी बजावण्याचे आदेशात म्हटले आहे. संबंधित जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांनी नायलॉन मांजाच्या वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेबाबत दि. 13 व 14 रोजीच्या दैनिकांमध्ये जाहीर नोटीसीद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्याचे नमूद केले आहे. या दंडाबाबत माहिती नसल्याचे कोणत्याही दोषी व्यक्तीला म्हणता येणार नाही, असे आदेशात न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोणालाही दंड भरण्याबाबत हा निर्णय आम्हाला माहित नाही असे दोषी व्यक्तींचे म्हणणे ग्राह्य धरले जाणार नाही, असे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती