सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 DIGITAL PUNE NEWS

दिमाखदार सांस्कृतिक सोहळ्याने ‘मकर संक्रांती महोत्सव’ व ‘हुरडा पार्टी’चा समारोप

डिजिटल पुणे    13-01-2026 11:50:55

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग येथील ‘नवीन महाराष्ट्र सदन’ येथे आयोजित तीन दिवसीय ‘मकर संक्रांती महोत्सव’ आणि ‘हुरडा पार्टी’चा सांगता सोहळा महाराष्ट्राच्या गौरवशाली सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. 9 ते 11 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवाला दिल्लीकर आणि उत्तर भारतातील मराठी बांधवांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

कडाक्याच्या थंडीतही हजारो नागरिकांनी या महोत्सवाला भेट देत महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि अस्सल रानमेव्याचा मनमुराद आनंद लुटला. महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘हुरडा पार्टी’साठी दिल्लीच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आले होते. शेतातून थेट आलेल्या कोवळ्या हुरड्यासोबत शेंगदाणा चटणी, खोबरे, गूळ आणि दह्याचा आस्वाद घेताना दिल्लीकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

महोत्सवाच्या सांगता समारंभा दिवशी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विद्यमाने आणि नवी मुंबई येथील जालगावकर आर्ट्स संचलित ‘महाराष्ट्र लोकसंस्कृती’ या विशेष सांस्कृतिक सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. सिद्धेश जालगावकर यांची निर्मिती आणि नृत्य दिग्दर्शन असलेल्या या कलाविष्काराची सुरुवात ‘स्वस्ती श्री’ आणि ‘मोरया’ या वंदनेने झाली, तर ‘विठू माऊली तू’ आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगांनी वातावरणात भक्तीरस निर्माण केला. या सोहळ्यात लावणी, धनगरी नृत्य, गोंधळ, पोतराज आणि कोळी नृत्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवण्यात आले.

विशेषतः ‘चंद्रा’, ‘वाजले की बारा’ आणि ‘पतंग उडवीत होते’ यांसारख्या प्रसिद्ध लावणी गीतांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. दादा कोंडके यांच्या अजरामर गीतांनी कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. या संपूर्ण सोहळ्यात 48 कलाकारांच्या चमूने आपल्या कलेचा आविष्कार सादर केला. महोत्सवाचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थ सादर केलेल्या गीतांनी झाला, ज्यामध्ये स्वतः सिद्धेश जालगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस्वी भूमिका साकारून उपस्थितांना भारावून टाकले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र सदन परिसर दुमदुमून गेला होता.

यशस्वी सोहळ्यानंतर निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी महोत्सवाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशिल गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी, सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह सदन व परिचय केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली, त्याबद्दल आयुक्तांनी सर्वांचे आभार मानले. तसेच या आयोजनात सहभागी झालेले कृषी विभाग व उमेद गटातील सर्व सदस्य, फाईन लाईन आर्ट अकादमी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे निर्माता व नृत्य दिग्दर्शक सिद्धेश जालगावकर, 48 कलाकार व तंत्रज्ञ आणि या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देणाऱ्या दिल्लीकर जनतेचे त्यांनी विशेष आभार मानले.

दिल्लीसारख्या महानगरात महाराष्ट्राची संस्कृती आणि खाद्यपरंपरा इतक्या प्रभावीपणे पोहोचवता आली ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या महोत्सवाने दिल्लीच्या सांस्कृतिक पटलावर महाराष्ट्राच्या अस्मितेची एक वेगळी छाप उमटवली आहे.


 Give Feedback



 जाहिराती