पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी), एरंडवणे,पुणे यांच्या वतीने आयोजित ‘इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट–२०२६’ शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी आयएमईडी, एरंडवणे येथे यशस्वीपणे पार पडली. उद्योगविश्व आणि शिक्षणक्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅक्सेन्चरचे व्यवस्थापकीय संचालक अमोल जोशी उपस्थित होते, तर मान्यवर वक्ते म्हणून आयसर्टिस कंपनीचे उपाध्यक्ष व हेड–एपीएसी नीरज आठल्ये यांनी मार्गदर्शन केले. भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती.आयएमईडीचे संचालक डॉ.श्रवण कडवेकर, उपसंचालक डॉ.आर.व्ही.महाडिक यांनी स्वागत केले.
दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या परिषदेत प्राध्यापक, विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'आयआयपीएस–२०२६' ही परिषद उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील संवाद, सहकार्य व ज्ञानविनिमयासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.पहिल्या पॅनल चर्चेचा विषय 'कॅम्पस टू कॉर्पोरेट 'असा होता.या सत्रात उद्योग आणि प्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ सहभागी झाले होते. या चर्चेचे संयोजन डॉ. निधी धनजू यांनी केले. पॅनलमध्ये कार्तिकेय चतुर्वेदी, रिशाल गडाख, मनीष रौशन,डॉ.उज्ज्वल भट्टाचार्य, नचिकेत दिवेकर आणि दर्शिनी दवे यांचा समावेश होता. या सर्व तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातून कॉर्पोरेट जगात प्रवेश करताना आवश्यक असलेली कौशल्ये, व्यावसायिक दृष्टिकोन, उद्योगाभिमुख तयारी, तंत्रज्ञानाची समज आणि सतत शिकण्याची मानसिकता यांचे महत्त्व सखोलपणे मांडले.दुसऱ्या पॅनल चर्चेचा विषय 'व्हॉट रिक्रुटर्स वाँट' असा असून आजच्या भरती प्रक्रियेत नियोक्त्यांच्या बदलत्या अपेक्षा या चर्चेतून स्पष्ट झाल्या. या सत्राचे संयोजन संजीव कुमार त्रिपाठी, यांनी केले. पॅनलमध्ये लव कुमार डॉ. संग्रामसिंह पवार,संतोष इसाळे, किरण वैद्य, अमोलखनाथ सिगेल, आणि रोहित ढवळीकर हे मान्यवर सहभागी झाले होते. या चर्चेतून तांत्रिक कौशल्यांबरोबरच संवाद क्षमता, समस्या सोडवण्याची वृत्ती, टीमवर्क, कामाबद्दलची बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि डिजिटल व एआय आधारित कौशल्यांची वाढती गरज यावर ठोस मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.