पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीनगर परिसरात शेवटची जाहीर सभा घेतली. या सभेतही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत वाकयुद्ध कायम ठेवले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवार–शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात पुणेकरांसाठी मोफत पीएमपीएल बससेवा आणि मोफत मेट्रो प्रवासाचे आश्वासन दिले आहे. याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
“मला कोणावर टीका करायची नाही. पण काही लोक आश्वासन देताना ते कुठून पूर्ण करणार आहेत, याचाच त्यांना पत्ता नसतो. पुण्यात एक म्हण आहे—‘खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा’,” असा टोला फडणवीसांनी लगावला.
फडणवीस म्हणाले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत आम्ही सातत्याने नवीन आणि आधुनिक पुणे घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. शहराचे दळणवळण सुधारण्यासाठी, झोपडपट्टीतील नागरिकांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ही निवडणूक गल्लीबोळातील दादा तयार करण्याची नाही, तर शहराचं भावी नेतृत्व ठरवण्याची आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.”
“तुम्ही निवडून देणारे नगरसेवक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खंबीरपणे उभा आहे. पुण्याच्या विकासासाठी जितका निधी लागेल तितका निधी दिला जाईल. शहरातील ३२ प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी डी-कन्जेशनचे काम केले जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “जोपर्यंत तुमचा लाडका देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता लाडकी बहीण नव्हे, तर लखपती दीदी घडवायच्या आहेत. देशात ५० लाख महिला लखपती दीदी झाल्या असून मोदींनी ही योजना सुरू केली आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत ही योजना राबवली जाईल.”
मतदानाचे आवाहन करताना त्यांनी स्पष्ट संदेश दिला. “१५ तारखेला सकाळी उठायचं, मतदान केंद्रावर जायचं, उमेदवाराचा चेहरा पाहायचा आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची—कमळाच्या बटणावर मत द्यायचं. १५ तारखेला कमळाची काळजी घेतली, तर पुढची पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ,” असे फडणवीस म्हणाले.