पुणे : पुण्याहून महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या तरुणाची पैशांच्या वादातून त्याच्याच मित्रांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ताम्हिणी घाट परिसरात उघडकीस आली आहे. या खून प्रकरणाचा माणगाव पोलिसांनी अवघ्या पाच ते सहा तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण ताम्हिणी घाट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दि. 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावाच्या हद्दीतील ‘सिक्रेट पॉईंट’ परिसरात एका तरुणाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. सुरुवातीला मृतकाची ओळख पटली नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.घटनास्थळी पंचनामा करत पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मृताच्या हातातील स्मार्टवॉचमधील माहिती, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
मृतकाची ओळख पटली
तपासात मृतकाची ओळख गणेश भगत (वय 22) रा. साई रेसिडेन्सी, इंद्रायणी नगर, भोसरी मूळ रा. चोवे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर अशी निष्पन्न झाली. मित्रांसोबतच होता प्रवास पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. गणेश भगत हा त्याचे मित्र आदित्य भगत, अनिकेत महेश वाघमारे, तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे आणि प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीरयांच्यासोबत इनोव्हा क्रिस्टा (MH12 XM 9448) या वाहनातून पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाला होता.
पैशांवरून वाद, कारमध्येच गळा आवळला
प्रवासादरम्यान पैशांच्या व्यवहारावरून मित्रांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले. आरोपींनी गणेशचा कारमध्येच दोरीने गळा आवळला. त्यानंतर सणसवाडी गावच्या हद्दीत एका निर्जन ठिकाणी नेऊन कोयत्याने डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर वार करत निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह घटनास्थळीच टाकून आरोपी फरार झाले.
अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 18/2026 अन्वये भा.न्या.संहिता 2023 चे कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनिकेत वाघमारे आणि तुषार पाटोळे यांना माणगाव येथून अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
ताम्हिणी घाट परिसरात भीतीचे वातावरण
मित्रांकडूनच मित्राची निर्घृण हत्या झाल्याने ताम्हिणी घाट परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. माणगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.