उरण : उरणमध्ये लहान मुलं व मुली पळवण्याचे प्रमाण वाढत असल्याने पालकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे, असे एनसीआरबीच्या प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे.
तर लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही, असे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. उरण मध्ये बोरी येथे लहान मुले पळविण्याचा प्रयत्न झाला मात्र स्थानिक नागरिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात बैठक सुद्धा संपन्न झाली आहे. बोरी किंवा उरण मधील इतर भागात खरच मुले पळविणारी टोळी आले आहेत का याचा अधिक तपास करीत असल्याचे तसेच नागरिकांनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नका असे आवाहन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानीफ मुलाणी यांनी केले आहे.आपल्या परिसरात कोणतेही अनोळखी, संशयांस्पद व्यक्ती आढळून आल्यास त्वरित उरण पोलीस ठाण्यात संपर्क करावे असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. उरण मधील विविध व्हाट्सअप ग्रुप वर लहान मुले चोरल्याचे अनेक संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे उरण मधील जनता मुले पळविण्याच्या या मेसेजने भयभयित झाले आहेत. त्यामुळे सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन उरण पोलीस ठाण्या मार्फत करण्यात आले आहे. मुले चोरणारी टोळी सक्रिय आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.
पालकांनी घ्यावयाची सावधानता:
- मुलांना अनोळखी व्यक्तींसोबत न जाण्याची सूचना करा
- मुलांना घराबाहेर जाण्यापूर्वी पालकांना कळवण्याची सूचना करा
- मुलांना सुरक्षित मार्गाने शाळेत जाण्याची व्यवस्था करा
- मुलांना मोबाइल फोन वापरण्याची सूचना करा आणि त्यांचा वापर कसा करावा हे शिकवा
- मुलांना इंटरनेट सुरक्षिततेबद्दल शिकवा आणि त्यांना अनोळखी व्यक्तींसोबत ऑनलाइन संवाद न साधण्याची सूचना करा