डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता संपल्यानंतर डोंबिवलीत मध्यरात्री हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांच्या पती ओमनाथ नाटेकर यांना दोन दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. ओमनाथ नाटेकर पैसे वाटत असल्याचा संशय व्यक्त करत रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.या प्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या मुलांचाही समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मात्र, मतदानाच्या अवघ्या काही तास आधी मंगळवारी रात्री पोलिसांनी रवी पाटील आणि नितीन पाटील यांना अटक केल्याने राजकीय वातावरण तापले. दोघेही जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी करून अटक करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अटकेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर मोठा गोंधळ झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तुकाराम नगर परिसरात सुमारे २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.“आमच्या उमेदवारांची प्रकृती गंभीर असताना त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांना काही झालं, तर त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल,” असा इशारा आमदार राजेश मोरे यांनी दिला.दरम्यान, अटक झाल्यामुळे रवी पाटील आणि नितीन पाटील यांना मतदान करता येणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून डोंबिवलीत राजकीय तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.