पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे मतदान उद्या पार पडणार असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीतील पक्ष अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने आरोप-प्रत्यारोपांचे फड रंगले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवारीवरून तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना तिकीट दिल्याच्या आरोपांमुळे निवडणूक आधीच वादात सापडली आहे.
अशातच मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळेच “आरक्षण” ठेवले असल्याचा खोचक आरोप त्यांनी केला आहे.
धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जर पक्षाचा प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरमधील पैसा डान्सबारमध्ये उडवत असेल, तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून वेगळी अपेक्षा तरी काय ठेवायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.त्यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याचा उल्लेख करत, संबंधित व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघातील आमदारांचे आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचा आरोप केला आहे. या आर्थिक व्यवहारांतून मिळालेल्या पैशातून बारबाळांसाठी ‘कोटा’ राखून ठेवला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
यासोबतच भाजप नेते आणि खासदार मुरलीधर मोहोळ तसेच चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर खुलासा करावा, अशी मागणी करत, “संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या भाजपमध्ये अशा चारित्र्यहीन लोकांसाठी किती जागा राखीव आहेत?” असा टोला धंगेकर यांनी लगावला आहे.
“पार्टी विथ डिफरन्स” असा उल्लेख करत त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.धंगेकरांच्या या पोस्टमुळे मतदानाच्या अवघ्या काही तास आधी पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.