पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. मतदानाच्या आदल्या रात्री मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते वसंत मोरे यांनी केला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील तीव्र राजकीय संघर्षामुळे पुणे महानगरपालिका निवडणूक अत्यंत रंगतदार ठरली आहे. अशा परिस्थितीत मतदारांना पैसे किंवा मौल्यवान वस्तू वाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग व पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे.वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 40 (ड) मधून निवडणूक लढवत आहे. मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून होणार असून, 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
कात्रज परिसरात चांदीच्या वाट्यांचा प्रकार
पुण्यातील कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये बुधवारी संध्याकाळी एका वाहनातून मोठ्या प्रमाणात चांदीच्या वाट्या नेल्या जात असल्याचा दावा वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी केला आहे. संबंधित वाहनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम यांच्या प्रचार पत्रिका तसेच मतदारांची यादी आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ही गाडी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठीच प्रभागात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.या संपूर्ण प्रकरणाबाबत वसंत मोरे यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.