सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 राजकारण

शंकर जगतापांचा उमेदवार ‘नमकहरामी’? अश्विनी जगतापांच्या स्टेटसमुळे जगताप कुटुंबातील गृहकलह पुन्हा चव्हाट्यावर; पिंपरीत एकच चर्चा

डिजिटल पुणे    14-01-2026 17:46:49

पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. भाजप आमदार शंकर जगताप यांनी दिलेल्या उमेदवारावर थेट ‘नमकहरामी’ असा आरोप करत भाजपच्या माजी आमदार आणि त्यांच्या वहिनी अश्विनी जगताप यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे पिंपरीत राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.शंकर जगताप आमदार झाल्यानंतर दीर-वहिनींमधील वाद मिटल्याचं चित्र काही काळ दिसून आलं होतं. मात्र मतदानाच्या तोंडावर अश्विनी जगतापांनी केलेल्या या पोस्टमुळे हा संघर्ष पुन्हा उफाळून आला असल्याचं स्पष्ट होत आहे.

‘निष्ठा की विश्वासघात?’ — अश्विनी जगतापांचा थेट सवाल

अश्विनी जगताप यांनी भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप यांना उद्देशून एक अत्यंत जहरी स्टेटस ठेवले आहे.त्यात त्यांनी म्हटलं आहे की,“15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं असं म्हणताना तुला लाज कशी वाटली नाही? जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्वाने राजकारण गाजवत होते, तेव्हा तू त्यांच्या सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास?”याचा अर्थ माऊली जगताप हे लक्ष्मण जगताप यांच्या ‘शेवटाची वाट पाहत होते’, असा थेट आरोप अश्विनी जगताप यांनी केला आहे.हे स्वप्न नाही, ही नमकहरामी आहे,” अशा शब्दांत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

माऊली जगतापांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात

शंकर जगताप यांनी माऊली जगताप यांना प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे माऊली जगताप हे मूळचे प्रभाग क्रमांक 29 मधील रहिवासी आहेत. त्यामुळे ‘आयात उमेदवार’ असा आरोप स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून सुरुवातीपासूनच केला जात आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माऊली जगताप यांनी गुलालात माखलेला फोटो शेअर करत,“15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं”असा भावनिक संदेश सोशल मीडियावर टाकला होता. हाच मजकूर अश्विनी जगतापांच्या रोषाचं मुख्य कारण ठरल्याचं दिसत आहे.

शंकर जगतापांवरही अप्रत्यक्ष निशाणा?

अश्विनी जगतापांच्या या स्टेटसमधून केवळ माऊली जगतापांवरच नव्हे, तर ‘अशा व्यक्तीला उमेदवारी देणाऱ्या’ आमदार शंकर जगतापांवरही अप्रत्यक्ष टीका करण्यात आल्याची चर्चा आहे.कारण दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी भविष्यात राजकीय धुरा शंकर जगतापांकडे सोपवण्याबाबत अनेकदा सूचक विधानं केली होती.चिंचवड पोटनिवडणूक असो वा 2024 विधानसभा निवडणूक — या प्रत्येक टप्प्यावर ‘जगताप घराण्याचा राजकीय वारसदार कोण?’ या मुद्द्यावरून दीर-वहिनींमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे.

मतदानावर परिणाम होणार?

मतदानाच्या काही तास आधी अश्विनी जगतापांनी ‘निष्ठा की विश्वासघात?’ असा सवाल उपस्थित करत दिवंगत लक्ष्मण जगताप समर्थकांच्या भावना दुखावल्याचं बोललं जात आहे. या वादाचा थेट परिणाम मतदानावर होणार का, याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शंकर जगताप आणि माऊली जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे.मतदानाच्या तोंडावर उफाळलेला हा गृहकलह पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा ठरतोय. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या वारशावरून सुरू असलेली ही अंतर्गत लढाई उद्याच्या निकालावर किती परिणाम करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती