पुणे : रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे महत्त्व याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.या निमित्ताने डी. ई. एस. मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेतील सीनियर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अलका टॉकीज चौकात जाऊन हा उपक्रम उत्साहात आणि आनंदात साजरा केला.
अलका टॉकीज चौकात रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम सांगणारे बॅनर हातात धरून तसेच ट्रॅफिक नियम कसे पाळावेत यावर आधारित कविता सादर करून विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. हेल्मेट घालून वाहन चालवणाऱ्या नागरिकांचे कौतुक म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांना गोळ्या दिल्या. तसेच, ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते त्यांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करून रस्ता सुरक्षेचे महत्त्व सांगणारे स्टीकर्स दिले. यावेळी पोलिसांची विशेष मदत झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.