पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना समोर आली आहे.प्रभाग क्रमांक 26 मधील तब्बल 6 मतदान केंद्रांवरील यंत्रणा बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला. तासाभराच्या प्रयत्नांनंतर काही ठिकाणी मशीन सुरू करण्यात आली, तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या.
या मतदान केंद्रांवर ईव्हीएम बिघाड
स्वारगेट पोलिस लाईन
सेंट हिल्डाज स्कूल (2 मतदान केंद्रे)
सावित्रीबाई फुले स्मारक
घोरपडे पेठ उद्यान – वसंतदादा अभ्यासिका
महात्मा गांधी उर्दू शाळा, गुरुवार पेठ
याशिवाय, ईव्हीएमवरील उमेदवारांचा सिक्वेन्स ‘अ-ब-क-ड’ प्रमाणे नसल्याचा आक्षेप उमेदवारांकडून घेण्यात आला आहे. यामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
EVM वरील वेळ उशिराची दाखवत असल्याचा आरोप – रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर संशय व्यक्त केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक ठिकाणी मतदानाची सुरुवातच बंद मशीनने झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.त्यांच्या पोस्टनुसार,अनेक EVM मशीनवर वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जात आहेकाही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराचे बटन दाबल्यानंतर लाईट लागत नाहीतर काही ठिकाणी शेवटचे बटन दाबल्यावर आवाज येतो, मात्र लाईट लागत नाहीहे सर्व प्रकार संशयास्पद असून निवडणूक प्रक्रियेबाबत अविश्वास निर्माण करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक ठेवावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
पुणे महापालिका निवडणूक – थोडक्यात माहिती
एकूण प्रभाग: 41
एकूण जागा: 165
एकूण उमेदवार: 1153
एकूण मतदार: 35,52,637
पुरुष: 18,32,789
महिला: 17,13,360
इतर: 488
एकूण मतदान केंद्रे: 4011
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार: 2
तब्बल 9 वर्षांनंतर पुणे महापालिकेची निवडणूक होत असून, महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. भाजपसमोर दोन्ही राष्ट्रवादींचे आव्हान असून, शिवसेना (शिंदे गट व उबाठा), काँग्रेस आणि मनसेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.