मुंबई : सध्या राज्यातील संपूर्ण प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. अशा पद्धतीने सत्तेत येणे म्हणजे विजय नसतो, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली.गुरुवारी राज ठाकरे यांनी दादर येथील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
“येन-केन-प्रकारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न”
राज ठाकरे म्हणाले, सध्या निवडणूक कशा पद्धतीने पार पडतेय हे संपूर्ण देश पाहतो आहे. सत्ताधाऱ्यांनी येन-केन-प्रकारे निवडणूक जिंकण्याचा निर्धारच केला आहे. दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने जबाबदारी झटकली. त्यानंतर व्हीव्हीपॅटचा मुद्दा मांडला असता, मतदान योग्य उमेदवारालाच गेले की नाही, हे मतदाराला समजण्याची कोणतीही खात्री नाही, अशी परिस्थिती आहे.
पाडू यंत्र, व्हीव्हीपॅट आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह
राज ठाकरे यांनी पाडू यंत्राबाबतही सवाल उपस्थित केले.“पाडू यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवण्यात आलेले नाही. त्याबाबत निवडणूक आयोग कोणतीही स्पष्ट माहिती देत नाही. सरकारने ठरवले आहे की विरोधी पक्ष नावाची गोष्टच संपवायची,” असा आरोप त्यांनी केला.
मार्करची शाई सॅनिटायझरने पुसतेय?
यापूर्वी मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई ठळक असायची. मात्र आता मार्करने खूण केली जात असून सॅनिटायझरने ती सहज पुसली जात असल्याचे उदाहरण देत त्यांनी चिंता व्यक्त केली.तसेच प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घराघरांत भेट देण्याची मुभा देण्यात आल्याने पैशांचे वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
“हे लोकशाहीचे लक्षण नाही”“संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी काम करत आहे. आम्ही हे सर्व रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र अशा प्रकारे सत्तेत येण्याला लोकशाहीतील विजय म्हणता येणार नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.दुबार मतदारांवर लक्ष ठेवा;
राज ठाकरेंच्या शिवसैनिक-मनसैनिकांना सूचना
दादरच्या छबिलदास मतदान केंद्रावर सकाळी दुबार मतदार सापडल्याची माहिती देत राज ठाकरे यांनी दिवसभर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले.“सत्तेच्या गैरवापराला मर्यादा असायला हव्यात. शाई पुसून पुन्हा मतदान करणे याला विकास म्हणायचे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.