पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर आले असून, पहिल्याच तासात मोठी राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. पुण्यामध्ये भाजप काहीशी आघाडीवर असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट व शरद पवार गट) कडवी झुंज देत असल्याचं चित्र आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अक्षरशः ‘जबरदस्त टक्कर’ पाहायला मिळत आहे.
पुण्यात भाजप आघाडीवर, राष्ट्रवादीचं कडवं आव्हान
पुणे महापालिकेत भाजप सध्या सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी गट मिळून भाजपसमोर मोठं आव्हान उभं करत असल्याचं स्पष्ट होत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये गुंड गजा मारणे यांची पत्नी पिछाडीवर असून, दुसऱ्या फेरीअखेर भाजप उमेदवारांची आघाडी कायम आहे. या प्रभागात स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित यांची आघाडी असल्याने ‘मूळ पुणेकरांचा प्रभाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
पुणे महापालिका – पहिला कल
भाजप – 39
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 0
शिवसेना (शिंदे गट) – 2
राष्ट्रवादी (अजित पवार) – 10
राष्ट्रवादी (शरद पवार) – 4
काँग्रेस – 2
इतर – 0
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘काट्यावरची’ लढत
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्या तासातच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष जवळपास समसमान जागांवर आघाडीवर असून, निकाल शेवटच्या फेऱ्यांपर्यंत रंगण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका (एकूण जागा – 128)
भाजप – 15
राष्ट्रवादी – 14
शिवसेना (शिंदे गट) – 2
राष्ट्रवादी (शरद पवार) – 1
काँग्रेस – 0
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 0
मनसे – 0
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) – 0
राजकीय वातावरण तापलं
सुरुवातीच्या कलांवरून पुण्यात भाजप आघाडीवर असली तरी राष्ट्रवादीची झुंज कायम आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता कुणाच्या हाती जाणार, याचा फैसला अद्याप अस्पष्ट असून, पुढील फेऱ्यांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.